चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बिल्ड युवर ड्रीम्स (BYD) ने 2025 मॉडेल वर्षासाठी त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Atto 3 आणि Seal भारतात सादर केल्या आहेत. या दोन्ही गाड्या अत्याधुनिक फीचर्ससह अपडेट करण्यात आल्या असून, त्यांच्या बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. केवळ 30,000 रुपये भरून ग्राहक या इलेक्ट्रिक कारची बुकिंग करू शकतात. या कार्समध्ये तंत्रज्ञान, आराम आणि कामगिरी या तीनही बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

BYD Atto 3: नवीन बॅटरी, जास्त रेंज आणि अपग्रेडेड इंटीरियर

BYD Atto 3 मध्ये कंपनीने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. या इलेक्ट्रिक SUV मध्ये पूर्वी दिलेल्या लीड अॅसिड बॅटरीऐवजी नवीन लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी पारंपरिक बॅटरीपेक्षा तब्बल सहा पट हलकी असून तिचे एकूण आयुष्य 15 वर्षांपर्यंत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Atto 3 मध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांचा समावेश आहे. पहिल्या प्रकारात 49.92 kWh क्षमतेची बॅटरी असून, ती एका पूर्ण चार्जवर 468 km रेंज देते. दुसऱ्या प्रकारात 60.48 kWh क्षमतेची बॅटरी असून त्याची रेंज तब्बल 521 km पर्यंत जाते. जलद चार्जिंगचा पर्याय देखील या कारमध्ये असून केवळ 50 मिनिटांत ही बॅटरी 0 ते 80 टक्के चार्ज होते.

नवीन Atto 3 मध्ये ब्लॅक थीम असलेले इंटीरियर, पुढील भागातील हवेशीर सीट्स, आणि सुधारित आरामदायक अनुभव मिळतो. या SUV च्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही; सुरुवातीची किंमत 24.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) असून ती पहिल्या 3000 ग्राहकांसाठीच लागू असेल.

Atto 3 चे तीन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत: डायनॅमिक: ₹24.99 लाख, प्रीमियम: ₹29.85 लाख, सुपीरियर: ₹33.99 लाख,

BYD Seal: लग्झरी सेडानमध्ये प्रीमियम फीचर्सची भर

BYD ने अद्याप नवीन Seal इलेक्ट्रिक सेडानच्या किंमती जाहीर केलेल्या नाहीत, त्या पुढील महिन्यात जाहीर होतील. मात्र कंपनीने या सेडानला अनेक अपग्रेड्स दिले आहेत. आता Seal मध्ये पॉवर सनशेड, सिल्व्हर-प्लेटेड डिमिंग कॅनोपी, सुधारित आणि शक्तिशाली एअर कंडिशनिंग सिस्टम, तसेच चांगल्या दर्जाचा एअर प्युरिफायर दिला आहे.

प्रीमियम व्हेरिएंटला विशेष फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पर्स असलेले अपडेटेड सस्पेंशन देण्यात आले आहे, ज्यामुळे गाडीचा आराम आणखी वाढेल. Seal च्या परफॉर्मन्स ग्रेडमध्ये DiSus-C इंटेलिजंट डॅम्पिंग सिस्टम आहे, जी रस्त्यावरील परिस्थितीनुसार सस्पेंशन आपोआप समायोजित करते.

याशिवाय या कारमध्ये आता वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto चा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, नवीन साउंड वेव्ह फीचरमुळे केबिनमधील आवाजाची गुणवत्ता आणि अनुभव सुधारला जाणार आहे.

भारतात BYD च्या 4400 कार्सची विक्री
भारतीय बाजारात BYD ला इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत कंपनीने एकूण 4400 कार्स विकल्या आहेत. यामध्ये BYD Seal च्या 1300 युनिट्स आणि BYD Atto 3 SUV च्या 3100 युनिट्सचा समावेश आहे. आता करण्यात आलेल्या फीचर्सच्या अपडेटमुळे ग्राहकांची मागणी आणखी वाढेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *