Mahakumbh 2025 : जगभरातील कोट्यवधी भाविक या पवित्र पर्वाला उपस्थित राहिले आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर त्रिवेणी स्नान करण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने प्रयागराजला येत आहेत. विशेष म्हणजे, यंदाचा महाकुंभ तब्बल 144 वर्षांनी घडून आलेला अत्यंत दुर्मीळ संयोग आहे. त्यामुळे या पर्वाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढले आहे.
महाकुंभाचा समारोप महाशिवरात्री (26 फेब्रुवारी 2025) रोजी होणार आहे. त्यामुळे अनेक भक्तांना महाकुंभात स्नानाची संधी मिळाली, तर काहींना यंदाचा कुंभ हुकल्याची हळहळ वाटत आहे. मात्र, पुढील कुंभमेळा कधी आणि कुठे होणार, याची माहिती घेतल्यास आपण वेळेवर तयारी करू शकतो.
कुंभमेळ्याचे चक्र: कुठे आणि कधी होतो कुंभ?
प्रत्येक 12 वर्षांनी महाकुंभ प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो, तर हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे दर 6 वर्षांनी अर्धकुंभ साजरा केला जातो. तसेच, या तीन ठिकाणीही दर 12 वर्षांनी मोठा कुंभमेळा भरतो.
पुढील कुंभमेळा: 2027 मध्ये नाशिकमध्ये भरणार
यंदाचा प्रयागराज महाकुंभ संपल्यानंतर पुढील मोठा कुंभमेळा नाशिकमध्ये 2027 मध्ये आयोजित होईल. यापूर्वी नाशिकमध्ये 2015 मध्ये कुंभमेळा पार पडला होता. नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावर हा भव्य धार्मिक सोहळा संपन्न होईल.
कुंभमेळ्याचा ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ
कुंभमेळ्याचा उल्लेख प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतो. समुद्रमंथनाच्या कथेप्रमाणे, अमृतकलशातून काही थेंब चार ठिकाणी सांडले – प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. त्यामुळेच या चार ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो.
कुंभमेळ्याचे आयोजन ग्रहगणनेच्या आधारे केले जाते. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणारा कुंभमेळा देखील अशाच ज्योतिषीय गणनेनुसार निश्चित करण्यात आला आहे. धार्मिक दृष्टिकोनातून कुंभस्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की या स्नानामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते.
भाविकांनी आतापासून तयारी करावी
जे भाविक यंदाच्या महाकुंभात सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी 2027 चा नाशिक कुंभ एक सुवर्णसंधी ठरू शकतो. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच नियोजन करून हा पवित्र सोहळा अनुभवण्याची तयारी करावी.