Home Loan Interest Rate:- घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतेक लोक गृहकर्जाचा पर्याय निवडतात. मात्र, सतत वाढणाऱ्या गृहकर्जाच्या व्याजदरांमुळे ग्राहकांवर आर्थिक भार वाढतो. याच पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही दिवसांपूर्वी रेपो दरात 0.25% कपात जाहीर केली होती. याचा थेट परिणाम देशातील काही प्रमुख बँकांनी त्यांच्या गृहकर्ज व्याजदरांमध्ये कपात करण्याच्या निर्णयावर झाला आहे. यामुळे नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि आधीच गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कशा प्रकारे ग्राहकांना होणार फायदा?

RBI च्या रेपो दर कपातीमुळे अनेक बँकांनी गृहकर्जावर घेत असलेल्या व्याजदरात घट केली आहे. विशेषतः, फ्लोटिंग व्याजदरावर गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना या कपातीचा थेट फायदा होणार आहे, कारण त्यांच्या EMI मध्ये घट होईल.

तसेच, जे नवीन ग्राहक गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहेत त्यांना आता कमी व्याजदरांमध्ये गृहकर्ज मिळण्याची संधी आहे. जुन्या ग्राहकांसाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांना त्यांच्या कर्जाच्या पुनरावृत्तीच्या वेळी व्याजदर कपातीचा फायदा मिळू शकतो.

कोणत्या बँकांनी गृहकर्ज व्याजदरात कपात केली?

RBI च्या निर्णयानंतर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या मोठ्या सरकारी बँकांनी त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

कॅनरा बँकेने गृहकर्जावरील रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 9.25% वरून 9.00% केला असून 12 फेब्रुवारी 2025 पासून हा बदल लागू करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदा देखील त्यांच्या RLLR मध्ये कपात करत 10 फेब्रुवारी 2025 पासून 9.15% वरून 8.90% पर्यंत कमी करणार आहे. बँक ऑफ इंडिया ने देखील 9.35% वरून 9.10% असा व्याजदर केला असून, 7 फेब्रुवारी 2025 पासून नवीन दर लागू होणार आहेत.

युनियन बँक ऑफ इंडिया ने गृहकर्जावरील व्याजदर 9.25% वरून 9.00% केला असून, तो 11 फेब्रुवारी 2025 पासून लागू होईल.

पंजाब नॅशनल बँक (PNB) देखील गृहकर्जावरील व्याजदर कपातीमध्ये सहभागी झाली आहे आणि त्यांनी 9.25% वरून 9.00% पर्यंत व्याजदर कमी केला आहे, जो 10 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेने देखील 9.35% वरून 9.10% असा व्याजदर निश्चित केला असून, 11 फेब्रुवारी 2025 पासून तो लागू केला जाईल.

रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) म्हणजे काय?

RLLR म्हणजे रेपो लिंक्ड लेंडिंग रेट, जो थेट RBI च्या रेपो दराशी जोडलेला असतो. जेव्हा RBI रेपो दरात कपात करते.तेव्हा बँकांवरील कर्जाचा भार कमी होतो आणि त्यामुळे ग्राहकांना कमी व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते. गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दर आहे.कारण तो त्यांच्या मासिक EMI वर थेट प्रभाव टाकतो.

गृहकर्जदार आणि नवीन अर्जदारांवर होणारा परिणाम

गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता कमी व्याजदरांमध्ये गृहकर्ज मिळू शकणार आहे, त्यामुळे त्यांचा EMI पूर्वीपेक्षा कमी येईल. जुने गृहकर्जधारक विशेषतः ज्यांचे कर्ज फ्लोटिंग व्याजदरावर आहे.त्यांना बँकांच्या व्याजदर पुनरावलोकनाच्या वेळी थेट फायदा मिळू शकतो.

मात्र या सुधारित व्याजदरांचा फायदा सहसा 3 ते 6 महिन्यांनंतर ग्राहकांना मिळतो. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी गृहकर्ज घेतले आहे.त्यांनी त्यांच्या बँकेशी संपर्क साधून नवीन व्याजदर लागू होण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी.

गृहकर्ज घेण्यासाठी हीच योग्य वेळ?

जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही सर्वात योग्य वेळ आहे. कमी व्याजदरांमुळे तुमच्या मासिक EMI चा भार कमी होईल आणि कर्ज परतफेड करणे अधिक सुलभ होईल. शिवाय नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका गृहकर्जावर अधिक चांगल्या ऑफर देण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *