Investment Formula:- प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य हवे असते आणि उत्तम जीवनशैलीसाठी योग्य प्रमाणात संपत्ती निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी योग्य वेळेत गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करता, तितका जास्त परतावा मिळतो आणि मोठ्या प्रमाणावर संपत्ती साठवण्याची संधी वाढते. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी एक खास गुंतवणूक पद्धत आहे, जी तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी करोडपती बनवू शकते.

१२-१५-२० फॉर्म्युला येईल फायद्याला

करोडपती होणे कठीण नाही. परंतु यासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक करणे आवश्यक आहे. १२-१५-२० फॉर्म्युला हा यासाठी एक प्रभावी उपाय आहे. या फॉर्म्युल्यानुसार, जर तुम्ही दरमहा २०,००० रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक १५ वर्षांसाठी सुरू ठेवली, तसेच सरासरी १२% परतावा मिळवला तर तुम्ही सहज करोडपती बनू शकता. उदाहरणार्थ जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली, तर ४० व्या वर्षी तुमच्याकडे १ कोटीहून अधिक निधी असेल.

१२% परतावा मिळवण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी?

यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपी (Systematic Investment Plan) हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड बाजाराशी निगडीत असल्यामुळे त्याचा परतावा निश्चित नसतो.परंतु दीर्घकालीन कालावधीसाठी विचार करता आर्थिक तज्ज्ञ १२% परताव्याची शक्यता दर्शवतात. काही उच्च परतावा देणारे इक्विटी फंड १५% ते १८% पर्यंत परतावा देऊ शकतात, त्यामुळे योग्य फंड निवडणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही दरमहा २०,००० रुपये एसआयपीमध्ये गुंतवत राहिलात तर १५ वर्षांनी तुमची एकूण गुंतवणूक ३६ लाख रुपये होईल. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर सरासरी १२% वार्षिक परतावा मिळाला तर १५ वर्षांत तुम्हाला ६४.९१ लाख रुपये व्याज मिळेल आणि तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक म्हणजेच १,००,९१,५२० रुपये होईल.

जर तुमचा मासिक पगार ६५,००० ते ७०,००० रुपयांच्या दरम्यान असेल तर तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या किमान ३०% गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवू शकता. आर्थिक नियोजनानुसार, प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाच्या किमान ३०% रक्कम गुंतवावी. जर तुम्ही दरमहा ६५,००० रुपये कमवत असाल, तर त्यातील १९,५०० रुपये म्हणजेच जवळजवळ २०,००० रुपये तुम्ही एसआयपीसाठी वापरू शकता. यामुळे तुम्ही भविष्यातील आर्थिक स्थैर्य मिळवू शकता आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकता.

दीर्घकालीन गुंतवणुकीचे अनेक फायदे

शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास चक्रवाढीचा (compounding) प्रभाव अधिक वाढतो आणि तुमच्या निधीत लक्षणीय वाढ होते. तसेच म्युच्युअल फंडांमुळे तुम्हाला महागाईवर मात करण्यास मदत होते. स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेचा धोका असला तरी
दीर्घकालीन गुंतवणुकीने हा धोका कमी करता येतो आणि तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो.

संपूर्ण गोष्टीचा विचार करता लवकर गुंतवणूक सुरू करणे आणि शिस्तबद्धपणे १२-१५-२० सूत्राचा अवलंब करणे तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी करोडपती बनवू शकते. त्यामुळे जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. आजच तुमच्या आर्थिक भविष्यासाठी योग्य पाऊल उचलून करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करणे गरजेचे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *