Tata Sons Financial Report 2024-25:
टाटा समूहाच्या मूळ होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सने आपल्या वार्षिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल दहा पटीनं वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये कंपनीचा नफा केवळ ₹२,६८० कोटी होता, तर २०२४-२५ मध्ये तो ₹२६,२३२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

या कालावधीत कंपनीच्या एकूण महसूलातही मोठी वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये ₹२४,८९६ कोटींचा महसूल नोंदवणाऱ्या टाटा सन्सने २०२४-२५ मध्ये ₹३८,८३५ कोटींचा महसूल मिळवला — म्हणजे जवळपास दीड पट वाढ.
तसेच, कंपनीची एकूण मालमत्ता ₹४५,५८६ कोटींवरून वाढून ₹१,४९,६८० कोटींवर पोहोचली आहे, म्हणजे साडेतीन पट वाढ.

गटातील सर्वाधिक महसूल टाटा मोटर्सकडून

टाटा सन्सच्या २०२४-२५ च्या वार्षिक अहवालानुसार, टाटा समूहाचा एकूण महसूल आता ₹१५.३४ लाख कोटींवर पोहोचला आहे. २०१९-२० मध्ये हा महसूल ₹७.८९ लाख कोटी रुपये होता, त्यामुळे पाच वर्षांत महसूलात मोठी झेप पाहायला मिळाली.

या एकूण महसुलात टाटा मोटर्सचा वाटा सर्वाधिक आहे. लिस्टेड कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सने आघाडी घेतली असून, तिच्यानंतर TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आणि टाटा स्टील अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या टाटा मोटर्सचा शेअर शुक्रवार (२६ जुलै) रोजी १.८५% नी घसरून ₹६८७.५५ रुपयांवर बंद झाला. मात्र, कंपनीच्या कमाईमुळे शेअरने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे आणि सोमवारी (२९ जुलै) तो फोकसमध्ये राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लिस्ट नसलेल्या कंपन्यांचाही वाटा मोठा

टाटा समूहातील लिस्ट नसलेल्या कंपन्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे:

  • एअर इंडिया: ₹७८,६३६ कोटींचा महसूल

  • टाटा इलेक्ट्रॉनिक्स: ₹६६,६०१ कोटींचा महसूल

या कंपन्यांच्या कमाईमुळे टाटा समूहाची एकूण आर्थिक ताकद अधिक ठोस बनली आहे.

एन. चंद्रशेखरन यांचे वाढलेले वेतन

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचे २०२४-२५ मधील एकूण वेतन ₹१५५.८१ कोटी रुपये होते. हे वेतन मागील वर्षाच्या तुलनेत १५% अधिक आहे, ज्यातून समूहाच्या वाढत्या आर्थिक यशात त्यांच्या योगदानाची पावती दिसते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *