Maruti Suzuki Car : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी मार्च 2023 मध्ये ग्राहकांना काही लोकप्रिय कार्सवर तब्बल 54,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. तुम्ही या डिस्कॉऊंट ऑफरचा फायदा घेऊन तुमच्यासाठी इग्निस, बलेनो आणि सियाझ सारख्या कार्स खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्हाला ही ऑफर कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर रोख ऑफर, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट लाभांच्या स्वरूपात मिळणार आहे. कंपनीच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक इग्निसवर 54,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 35,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट फायदा समाविष्ट आहे.
त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 34,000 रुपयांची सूट आहे. याशिवाय मारुतीच्या बलेनोवर 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याचे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 90 एचपी पॉवर देते. तथापि, त्याच्या CNG आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटवर कोणतीही सूट नाही. कंपनीने Ciaz वर 28,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. यामध्ये 25,000 रुपयांची एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
मारुतीचे म्हणणे आहे की सेमीकंडक्टरची कमतरता पुढील काही तिमाही टिकू शकते. यामुळे कंपनीच्या काही वाहनांच्या प्रलंबित ऑर्डरची संख्या आणखी वाढेल. कंपनीकडे अशा ऑर्डरची संख्या 3.69 लाख युनिट्सपर्यंत वाढली आहे. यापैकी सर्वाधिक ऑर्डर्स एर्टिगासाठी सुमारे 94,000 आहेत. कंपनीकडे ग्रँड विटारा आणि ब्रेझ्झासाठी अनुक्रमे 37,000 आणि 61,500 युनिट्सची ऑर्डर प्रलंबित आहे. याशिवाय, मारुतीकडे जिमनी आणि फ्रॉन्क्ससाठी अनुक्रमे 22,000 आणि 12,000 बुकिंग आहेत.
सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान कंपनीला सुमारे 46,000 युनिट्सचे उत्पादन तोटा सहन करावा लागला. चालू तिमाहीत कंपनीच्या उत्पादनावरही काही परिणाम होऊ शकतो.
शशांक श्रीवास्तव, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग एंड सेल्स), मारुती सुझुकी म्हणाले, “सेमीकंडक्टरचा तुटवडा कायम आहे. सामान्य स्थितीसाठी टाइमलाइन सांगणे कठीण आहे.” फेब्रुवारीमध्ये मारुतीची एकूण विक्री जवळपास पाच टक्क्यांनी वाढून 1,72,321 युनिट्स झाली.
गेल्या वर्षी याच महिन्यात ते 1.64 लाख युनिट होते. कंपनीची देशातील प्रवासी वाहन विक्री जवळपास 10 टक्क्यांनी वाढून 1,47,467 युनिट्सवर पोहोचली आहे. मात्र, त्याची निर्यात 28.4 टक्क्यांनी घटली आहे. गेल्या महिन्यात त्याच्या एकूण विक्रीमध्ये देशात विकल्या गेलेल्या 1,50,823 युनिट्स, इतर OEM ला विकल्या गेलेल्या 4,291 युनिट्स आणि निर्यात केलेल्या 17,207 युनिट्सचा समावेश आहे.