Investment tips : चांगल्या भविष्यासाठी तसेच भविष्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण गुंतवणूक करत असतो, दरम्यान ही गुंतवणूक आपल्यासाठी अजून चांगल्या प्रकारे फायद्याची कशी ठरेल यासाठी आम्ही काही गोष्टी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

वास्तविक शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत नेहमी असे म्हटले जाते की, तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. तरुणांसाठी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे त्यांची आर्थिक कौशल्ये सुधारणे, ही तरुणांची सर्वोत्तम वैयक्तिक गुंतवणूक आहे. आर्थिक कौशल्यांमधील प्रवीणता त्यांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय ओळखण्यात नक्कीच मदत करेल. सर्व गुंतवणूकदारांना नेहमी असा सल्ला दिला जातो की, आयुष्यात लवकर गुंतवणूक करायला सुरुवात करावी. परंतु तरुण गुंतवणूकदार लवकर सुरुवात करताना काही सामान्य चुका करतात.

1. आर्थिक गुंतवणुकीचे कमी ज्ञान

गुंतवणूकीच्या सुरुवातीच्या दिवसांत तरुणांनी केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांची आर्थिक साक्षरता नसणे. शेअर बाजाराशी निगडीत सामान्य परिसंस्थेची माहिती असल्याशिवाय त्यांना महत्त्वाचे निर्णय घेणे अशक्य आहे. अनेकदा तरुण नवीन गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याज किंवा जोखमीचे वैविध्य यासारख्या मूलभूत संकल्पना समजत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला त्यांचे मोठे नुकसान होते. ही चूक टाळण्याचा एक मार्ग म्हणजे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैयक्तिक वित्त आणि गुंतवणुकीबद्दल स्वतःला जागरूक करणे.

2. गुंतवणूक योजनेचा अभाव 

गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा जवळजवळ सर्व तरुण करत असलेली आणखी एक चूक म्हणजे गुंतवणुकीचे स्पष्ट उद्दिष्ट आणि रोडमॅप नसणे. अनेक वेळा तरुण गुंतवणूकदार त्यांच्या उद्दिष्टांचा किंवा त्यांना ते कसे साध्य करायचे आहेत याचा विचार न करता गुंतवणूक करतात. त्यामुळे शेवटी तो झटपट निर्णय घेतो जो चुकीचा ठरतो. गुंतवणुकीची स्पष्ट योजना नसताना, गुंतवणुकीचे अचूक आणि फायदेशीर निर्णय घेणे हे खूप कठीण पाऊल असू शकते.

3. कमी वेळेत नफा 

अनेकदा तरुणांना त्यांच्या मित्रांकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून कमी वेळेत नफा कमावल्याबद्दल ऐकू येते आणि तेही त्यामागे धावू लागतात. गुंतवणुकीचा हा एक धोकादायक मार्ग आहे आणि तोही जेव्हा तुम्ही गुंतवणुकीच्या जगात नवीन खेळाडू असाल. गुंतवणुकीत दीर्घकालीन उद्दिष्टामागे ध्येय ठेवून गुंतवणूकीची तयारी करावी. कमी वेळेत गुंतवणुकीतून दुप्पट किंवा तिप्पट कमाई करण्याच्या मागे वेळ वाया घालवू नये.

4. पोर्टफोलिओमध्ये विविधता आणत नाही 

नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व पैसे एकाच ठिकाणी ठेवण्याची गरज नाही. एकाच क्षेत्रात फक्त एकाच कंपनीत किंवा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे खूप धोक्याचे असते. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणूक आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, एका कंपनीतील गुंतवणूक खराब कामगिरी करत असल्यास, दुसरी कंपनी चांगली कामगिरी करून तोटा संतुलित करू शकते. विविधीकरण हा जोखीम व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे.

5. भावनांवर आधारित गुंतवणूक टाळा 

अनेक तरुण अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात ज्यांची त्यांना आवड आहे. भावनेने गुंतवणूक करणे कधीही धोक्याचे असते. या निर्णयाचा सर्वाधिक फटका तरुणांना बसला आहे. आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय हे भावनिक निर्णय न घेता संशोधनावर आधारित असावेत. आर्थिक शिक्षणाचे ज्ञान या पैलूमध्ये संतुलन राखण्यास मदत करते.