Share Market : जागतिक स्तरावर मंदीच्या भीतीने, भारतीय शेअर बाजार शुक्रवारी, 23 सप्टेंबरला सलग तिसऱ्या दिवशी घसरले आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 1,000 हून अधिक अंकांनी घसरला. यासोबतच शुक्रवारी गुंतवणूकदारांचे शेअर बाजारात सुमारे 5 लाख कोटींचे मोठे नुकसान झाले.

30 शेअर्सचा सेन्सेक्स आज 1,020.80 अंकांनी म्हणजेच 1.73% घसरून 58,098.92 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, तो एका वेळी 1,137.77 अंकांपर्यंत घसरला होता. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी (निफ्टी 50) देखील 302.45 अंकांनी म्हणजेच 1.72 टक्क्यांनी घसरून 17.327.35 वर बंद झाला.

या घसरणीसह, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल शुक्रवारी सुमारे 4.9 लाख कोटी रुपयांनी घसरून सुमारे 2,76,64,567 कोटी रुपये झाले. गुरुवार 22 सप्टेंबर रोजी व्यवसाय बंद झाला तेव्हा तो 2,81,54,729.34 कोटी रुपये होता. अशाप्रकारे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आज सुमारे 4.9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बाजारात सर्वात मोठी घसरण पॉवर, रिअल्टी आणि बँक शेअर्समध्ये झाली. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. भांडवली वस्तू, ऊर्जा, स्थावर मालमत्ता आणि बँक निर्देशांक 2-3 टक्क्यांनी घसरले.

फक्त 959 शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले, तर 2417 शेअर्स खाली बंद झाले. 106 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ७.९ टक्के घसरण झाली. अपोलो हॉस्पिटल्स, हिंदाल्को इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स आणि एसबीआयचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात होते.

इतर आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सँग घसरला. युरोपीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात घसरण झाली. गुरुवारी अमेरिकन बाजारात घसरण झाली.