share_market__0

Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता.

दरम्यान भारत गीअर्सचे शेअर्स आजच्या व्यवहारात 18 टक्क्यांहून अधिक चढले. कंपनीच्या बोर्डाने बोनस शेअर्सच्या मुद्दयावर विचार करण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आज या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली.

आज दुपारी 2:14 वाजता भारत गीअर्सचे शेअर्स बीएसईवर 178 रुपयांवर व्यवहार करत होते, जे आधीच्या बंदच्या तुलनेत 18.94 टक्क्यांनी वाढले होते. अलीकडच्या काळात भारत गीअर्सच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांत बीएसईवर कंपनीचे शेअर्स जवळपास 30 टक्क्यांनी वधारले आहेत.

भारत गीअर्स वित्त समितीची बैठक 19 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. ते राखीव भांडवलीकरणाद्वारे सभासदांना बोनस समभाग देण्याबाबत चर्चा करेल. असे कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

सेबी (प्रोहिबिशन ऑफ इनसाइडर ट्रेडिंग) रेग्युलेशन 2015 नुसार इनसाइडर ट्रेडिंग प्रतिबंधक संहितेसह, कंपनीच्या शेअर्समधील व्यवहारांसाठी प्रवर्तक, संचालक, प्रमुख व्यवस्थापकीय अधिकारी, नॉमिनी आणि त्यांचे सहयोगी यांच्यासाठी ट्रेडिंग विंडो बंद केली जाईल.

आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल – जून 2022 तिमाहीसाठी कंपनीने सांगितले की त्यांची निव्वळ विक्री 11.71 टक्क्यांनी वाढून 183.97 कोटी रुपये झाली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 164.68 कोटी रुपये होती. एप्रिल-जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 32.7 टक्क्यांनी घसरून 4.30 कोटी रुपयांवर आला आहे.