Adani Group : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अदानी समूह भरभराटीला आला आहे. समूहाकडून बरेच प्रोजेक्ट उपलब्ध झाले आहेत. अशातच अदानी समूहाचे शेअर्सदेखिल भरपूर प्रमाणात उसळी घेत आहेत.

दरम्यान 23 ऑगस्ट रोजी, अदानी समूहाने NDTV मधील सुमारे 29 टक्के भागभांडवल विकत घेण्याची घोषणा केली होती. याचा परिणाम 24 ऑगस्ट (बुधवार) रोजी एनडीटीव्हीच्या शेअर्सवर झाला. बाजार सुरू होताच एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी वाढ होऊन अपर सर्किट झाले. गुरुवारी (२५ ऑगस्ट) बाजार उघडताच एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट दिसून आले. त्याची किंमत 407.60 रुपये झाली.

गेल्या एका वर्षात हा शेअर जवळपास 400 टक्क्यांनी वाढला आहे. एनडीटीव्ही आणि अदानी समूह यांच्यातील या करारावरील चर्चेमुळे एक वर्षाहून अधिक काळ NDTV चे शेअर्स तेजीत होते. अदानी समूहाच्या मीडिया कंपनीने NDTV मधील 29. 18 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. अदानी समूहाने खुल्या ऑफरद्वारे एनडीटीव्हीमधील आणखी 26 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांची NDTV मध्ये 32.26 टक्के हिस्सेदारी आहे. अदानी समूहाने अप्रत्यक्षपणे NDTV मध्ये भागभांडवल असलेल्या RRPR या आणखी एका कंपनीकडून 29.18 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. त्यानंतर, ओपन ऑफरची घोषणा केली आहे. याचा अर्थ 38.55 टक्के सार्वजनिक भागधारकांकडून 26 टक्के हिस्सा खरेदी करावा लागेल. प्रणव आणि राधिका हे NDTV चे संस्थापक आणि प्रवर्तक आहेत.

NDTV चा स्टॉक 25 ऑगस्ट 2021 रोजी फक्त 75.20 रुपये इतका होता. आता तो 407 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने विश्लेषकही आश्चर्यचकित झाले आहेत. या काळात एनडीटीव्हीच्या व्यवसायात कोणताही मोठा बदल झालेला नाही, असे त्यांचे मत आहे. एनडीटीव्हीचे वृत्त श्रेणीतील तीन मुख्य चॅनेल्स आहेत. यामध्ये एक वृत्तवाहिनी इंग्रजी तर दुसरी हिंदीची आहे. तिसरे चॅनल ‘एनडीटीव्ही प्रॉफिट’ हे बिझनेस चॅनल आहे.

सलग दोन दिवस अप्पर सर्किट मारल्यानंतर एनडीटीव्हीच्या शेअरच्या किमतीने ओपन ऑफरमध्ये निश्चित केलेल्या किमतीला ओलांडले आहे. अदानी समूहाने ओपन ऑफरमध्ये एनडीटीव्हीच्या शेअर्ससाठी प्रति शेअर २९४ रुपये किंमत निश्चित केली आहे. गुरुवारच्या 407 रुपयांच्या किमतीपेक्षा हे खूपच कमी आहे. बहुतेक गुंतवणूकदारांचे असे मत आहे की यामुळे, बहुतेक किरकोळ गुंतवणूकदार खुल्या ऑफरमध्ये त्यांचे शेअर्स विकू इच्छित नाहीत.