Edible Oil Price :वास्तविक पाहता खाद्यतेलाचे वाढलेले भाव हे सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत असतात. हीच सर्वसामान्यांची डोकेदुखी सरकारविरुद्धच्या रोषाला कारणीभुत ठरत असते. यामुळे खाद्य तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

अशातच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू शकतात, असे दिसते.

काय कारण आहे: खरं तर, इंडोनेशिया देशांतर्गत टंचाई कमी करण्यासाठी आणि गगनाला भिडणाऱ्या किमतींना आळा घालण्यासाठी खाद्यतेल आणि त्याच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालेल. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी ही घोषणा केली.

विडोडो म्हणाले, “देशातील खाद्यतेलाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आणि वाजवी किमतीत राखली जावी यासाठी मी या धोरणाच्या अंमलबजावणीचे निरीक्षण आणि मूल्यमापन करत राहीन.”

हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे, जेव्हा इंडोनेशियातील लोक खाद्यपदार्थांच्या महागाईविरोधात आंदोलन करत आहेत.

भारत सर्वात मोठा खरेदीदार:भारत हा खाद्यतेलाचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारत त्याच्या अर्ध्याहून अधिक पामतेल आयातीसाठी सर्वोच्च उत्पादक इंडोनेशियावर अवलंबून आहे.