Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले असून, २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा आता चक्क ७० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे.

राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे आता बाजारात चांगला कांदा येण्याचे प्रमाणही कमी होत आहे. त्याचाच परिणाम कांद्याच्या दरवाढीवर होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला व नवीन पीक येण्यास विलंब लागणार असल्यामुळे देशात सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे.

मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ७०५ टन कांद्याची आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये ४० ते ७० रुपयांनी त्याची विक्री होत होती. किरकोळ मार्केटमध्येही कांद्याचे दर झपाट्याने वाढत आहेत.

मध्यम दर्जाचा कांदा ६० रुपये व चांगल्या दर्जाचा कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. सद्य:स्थितीत मुंबईमध्ये नाशिक, पुणे, अहमदनगरमधून कांद्याची आवक होत आहे. उत्पादक जिल्ह्यांमध्येच दर वाढल्यामुळे मुंबईमध्येही प्रतिदिन भाव वाढत आहेत.

घाऊक बाजारात कांदा २० ते २५ रुपये किलो असतानाच, किरकोळ बाजारात कांदा ४० ते रुपये किलो झाला होता. त्यामुळे घाऊक बाजारात ७० रुपये किलोने विकला जाणारा कांदा किरकोळ बाजारात ८० रुपये किलो झाला आहे. परिणामी गृहिणींचे स्वयंपाकघराचे गणित बिघडले आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology