ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार दोन महिन्यांपासून ठप्प

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- शासनाच्या ऑनलाइन पब्लिक फायनाशिअल मॅनेजमेंट सिस्टीम (पीएफएमएस) या कार्यप्रणालीचा वापर केला नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांशी ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. परिणामी विकासकामांवर परिणाम होत आहे.

पीएफएमएस कार्यप्रणालीत त्रुटी असल्याचा आरोप :- ग्रामपंचायतीला शासनाकडून येणारा निधी खर्च करताना त्याच्या ऑनलाइन नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या पीएफएमएस कार्यप्रणालीचा वापर करा, असे आदेश गेल्या वर्षी शासनाकडून सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

कार्यप्रणालीवर ऑनलाइन नोंदी करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये नेमलेल्या संगणक परिचालकांची मदत घ्या, असे सुचवले होते; परंतु यामध्ये अनेक त्रुटी आहेत असे सांगून याची अंमलबजावणी ग्रामसेवकांकडून झाली नाही. पुणे जिह्यातील १४८५ ग्रामपंचायतीपैकी फक्त २०० ते २५० ग्रामपंचायतींनी पीएफएमएस कार्यप्रणालीचा वापर करून व्यवहार केले आहेत.

Advertisement

अडचणी समजून घ्या :- ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहार ऑनलाइन करा, असा सरकारचा हट्ट आहे, तर प्रत्यक्ष काम करताना अनेक त्रुटी येतात. त्यामुळे यातील अडचणी समजून घ्या, असे ग्रामसेवकांचे मत आहे. इतर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी पाहा आणि थांबा अशी भूमिका घेतली आहे.

गेल्या वर्षभरात टाळेबंदीमुळे कामकाजही मंद गतीने होते. दरम्यानच्या काळात विकासकामे झाली. कामाची बिले मिळावीत यासाठी ठेकेदारांनी ग्रामसेवकांच्या मागे तगादा लावला आहे, तर ग्रामसेवक पीएफएमएस प्रणालीत अडचणी असल्याचे सांगत आहेत.

अडचणी दूर करू :- “पीएफएमएस कार्यप्रणालीची नोंदणी करण्यात राज्यात दोन नंबरचे काम पुणे जिल्ह्याचे आहे. याबाबत सर्व ग्रामसेवकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले आहे. तालुका पातळीवर मदतीसाठी प्रतिनिधी दिला आहे. पद्धत नवीन असल्याने अवघड वाटत असले, तरी वापरातूनच शिकता येईल. उद्भवलेल्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.

Advertisement

पारदर्शकता येईल; परंतु प्रक्रिया गुंतागुंतीची :- ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ म्हणाले, “पीएफएमएस प्रणालीमुळे कामात पारदर्शकता येईल; पण प्रक्रिया क्लिष्ट आहे. तांत्रिक अडचणी दूर करणे गरजेचे आहे.”

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker