Rakesh JhunJhunwala Portfolio: बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. मागील महिना डेल्टा कॉर्पच्या गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरला आहे.

बीएसईवर गुरुवारी कंपनीचे शेअर्स 2% घसरले. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 21% ची घसरण झाली आहे.

भारतीय शेअर बाजारातील बिग-बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी डेल्टा कॉर्पमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे.

कंपनी एक्सचेंजला दिलेल्या माहितीत राकेश झुनझुनवाला यांनी 25 लाख शेअर्स किंवा 0.9% स्टेक कमी केल्याचे सांगण्यात आले आहे.

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 31 मार्च 2022 पर्यंत डेल्टा कॉर्पमध्ये 7.2% स्टेक आहे. ताज्या अपडेटनुसार, आता त्यांच्याकडे डेल्टा कॉर्पमध्ये एकूण 16500000 शेअर्स किंवा 6.2 % स्टेक आहेत.

डेल्टा कॉर्प ही गेमिंग आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय करणारी भारतीय कंपनी आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 18% वाढ झाली आहे.

पण 2022 च्या कामगिरीवर नजर टाकल्यास हा शेअर निराश करतो. 2022 मध्ये कंपनीच्या स्टॉकमध्ये 19% ची घसरण झाली आहे. चौथ्या तिमाहीतील निकालांमुळे गुंतवणूकदारांचीही निराशा झाली.

कंपनीचा निव्वळ नफा 17 टक्क्यांनी घसरून 48 कोटी रुपयांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 58 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.