1633984946-8414

Rakesh JhunJhunwala : भारतीय शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. रविवारी सकाळी वयाच्या ६२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला हे शेअर मार्केटच्या जगात बिग बुल म्हणून ओळखले जात होते. जोखीम घेऊन गुंतवणूक केल्यामुळे आणि योग्य कंपन्यांची निवड केल्यामुळे त्यांना भारताच्या बाजारपेठेतील वॉरेन बफे म्हटले गेले.

ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान, अर्थमंत्री तसेच केंद्रीय मंत्री आणि उद्योगपतींनी शोक व्यक्त केला आहे. भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल म्हटल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर आता लोकांच्या नजरा त्यांच्या 40 हजार कोटींहून -अधिकच्या साम्राज्यावर लागल्या आहेत.

राकेश झुनझुनवाला यांची रेअर एंटरप्रायझेस नावाची कंपनी आहे. हीच कंपनी बिग बुलच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करते. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची अकासा एअरमध्ये एकूण ४० टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. राकेश झुनझुनवाला हे स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्सचे प्रवर्तकही होते. जूनच्या तिमाहीत यात त्यांचा हिस्सा 17.5 टक्क्यांच्या जवळ होता.

आता हे साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नीवर आली आहे. रेखा झुनझुनवाला त्यांच्या मुलांसह राकेश झुनझुनवालाचे रेअर एंटरप्रायझेस हाताळू शकतात.

राकेश झुनझुनवाला यांच्या निधनामुळे आकासा एअरलाइन्स आणि इतर व्यवसायांना मोठ्या -आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्ठा झुनझुनवाला, मुलगा आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे.

एका इव्हेंटमध्ये बिग बुलने सांगितले होते की त्यांचे वडील त्याचे पहिले रोल मॉडेल होते. त्यांचा दुसरा आदर्श टाटा समूह होता. राकेश झुनझुनवाला यांनी अनुभवी गुंतवणूकदार आणि डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनाही आपला आदर्श मानले.

राकेश झुनझुनवाला यांच्या निधनावर गौतम अडानी यांनी ट्विट केले, “भारतातील सर्वात महान गुंतवणूकदाराच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांच्या तेजस्वी विचारांनी, त्यांनी संपूर्ण पिढीला भारताच्या इक्विटी मार्केटवर विश्वास ठेवण्यास प्रेरित केले. आम्हाला त्यांची आठवण येईल.

राकेश झुनझुनवाला भक्कम फंडामेंटल्स, उत्तम व्यवसाय वाढ आणि कमी मूल्यांकन असलेले स्टॉक्स निवडण्यात तज्ञ होते. या कारणास्तव, शेअर बाजारातील गुंतवणूकदार त्यांच्या मागे लागायचे आणि त्याने गुंतवलेल्या शेअर्सवर पैज लावायला तयार होते. राकेश झुनझुनवाला, ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये अवध्या ₹ 5000 ची गुंतवणूक केली, ते 40000 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक बनले.

भारताचे वॉरन बफे म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्यासाठी असे म्हटले जाते की त्यांनी जे काही स्पर्श केले ते सोने झाले. राकेश झुनझुनवाला यांची यशोगाथा स्वप्नासारखी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी हे त्यांनी जगाला शिकवले. राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरने काही दिवसांपूर्वी उड्डाण करण्यास सुरुवात केली आहे.