Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी भारतात नव्हे तर जगभरात आपला डंका वाजवत आहेत. मेहनतीच्या जोरावर त्यांनी आजघडीला इतके साम्राज्य उभारले आहे.

2002 मध्ये जेव्हा वडिल धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी आपले दोन्ही पुत्र मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना आपल्या संपत्तीत एकसमान वाटा दिला होता,

परंतु आज त्यांचा धाकटा मुलगा अनिल अंबानी अपयशाच्या मार्गावर आहे, तर मोठा मुलगा मुकेश अंबानी हे मात्र सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

दरम्यान आता अशातच इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) मध्ये गुंतवणूक करून पैसे कमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) टेलिकॉम कंपनी Jio देखील IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, उद्योगपती मुकेश अंबानी RIL च्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याबाबत घोषणा करू शकतात.

अंबानींच्या योजनेत त्यांची दूरसंचार फर्म रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (RJPL) आणि RIL ची उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) साठी स्वतंत्र IPO समाविष्ट आहेत.

या दोन कंपन्यांच्या IPO च्या माध्यमातून अंबानी 50,000 कोटी ते 75,000 कोटी रुपयांच्या दरम्यान मोठी रक्कम उभारण्याचा विचार करत आहेत. या IPO नंतर या दोन्ही कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.

ग्लोबल लिस्टिंग देखील शक्य आहे: सूत्रांनुसार, दोन्ही कंपन्यांची ग्लोबल लिस्टिंग देखील भारतातील सूचीसोबत होऊ शकते. रिलायन्स जिओला अमेरिकेतील नॅस्डॅक प्लॅटफॉर्मवर देखील सूचीबद्ध केले जाऊ शकते.

Nasdaq हे तंत्रज्ञान कंपन्यांसाठी जगातील सर्वात मोठे मार्केटप्लेस आहे. सूत्रांनी सांगितले की रिलायन्स रिटेलचा IPO लॉन्च डिसेंबर 2022 पर्यंत होईल.

यानंतर रिलायन्स जिओचा IPO लॉन्च होण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये रिलायन्स जिओने फेसबुक आणि गुगलसह 13 गुंतवणूकदारांना 33 टक्के स्टेक विकले होते.

LIC पेक्षा मोठा IPO: तथापि, रिलायन्सने या दोन कंपन्यांकडून अंदाजे रक्कम वाढवल्यास, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. सध्या LIC चा IPO सर्वात मोठा मानला जातो. हा IPO 21 हजार कोटींचा आहे. LIC चा IPO लॉन्च 4 मे रोजी होणार आहे.