Gautam Adani :  सध्या भारतात सामायिक कमाईपेक्षा वैयक्तिक कमाई जोरात सुरु आहे. अंबानी आणि अदानी यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत सर्वात अग्रेसर राहत आहे. अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे.

गौतम अदानी आता उत्तर प्रदेशात (यूपी) मोठा सट्टा खेळणार आहे. अदानी समूह यूपीमध्ये 70,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. गौतम अदानी यांनी उत्तर प्रदेश गुंतवणूकदार समिट 2022 मध्ये ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले, “आम्ही राज्यात 70,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत आहोत. या गुंतवणुकीतून 30,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची आम्हाला अपेक्षा आहे.” या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.

काय म्हणाले गौतम अदानी? :- गौतम अदानी यांनी जाहीर केले की अदानी समूह उत्तर प्रदेशमध्ये 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, ज्यामुळे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात 30,000 नोकऱ्या निर्माण होतील.

लखनौमध्ये आयोजित करण्यात आलेल्या यूपी इन्व्हेस्टर्स समिटला अदानी संबोधित करत होते. गुंतवणूकदार समिटमध्ये गौतम अदानी म्हणाले की, अदानी समूह राज्यातील रस्ते आणि वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन समारंभाचे उद्घाटन :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 1,406 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली.

या प्रकल्पांमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्र, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स, एमएसएमई, उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, फार्मा, पर्यटन, संरक्षण आणि एरोस्पेस, हातमाग आणि वस्त्रोद्योग इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. गौतम अदानी यांच्याशिवाय आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला, हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी यांचा समावेश होता.