file photo

दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. परंतु आपल्या देशात काही ठिकाणी आजही रावणाची पूजा केली जाते. आज आपण आशाच काही मंदिरांची माहिती घेणार आहोत.

महाराष्ट्र :- महाराष्ट्रातील कोरकू नावाच्या आदिवासी जमातीतले लोक रावण आणि त्याचा मुलगा मेघनाद यांना आपले रक्षक मानतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावणाचं पूजन करून उत्सव साजरा केला जातो.

कर्नाटक :- कर्नाटकातील कोलार नावाच्या जिल्ह्यात मात्र रावणाची पूजा केली जाते. रावणाच्या शिवभक्त रुपाची इथे पूजा केली जाते. इथे मंडया तालुक्तातील मालवली या गावात रावणाचं मंदिर आहे. तिथे त्याची पूजा केली जाते.

उज्जैन, मध्य प्रदेश :- मध्य प्रदेशातल्या उज्जैन जिल्ह्यात चिखली या गावात रावण दहन केलं जात नाही. इथे रावणाची भव्य मूर्तीही असून दसऱ्याला त्याची पूजा करण्याची प्रथा आहे.

बिसरख, उत्तर प्रदेश :- बिसरख या गावाला रावणाचं आजोळ मानलं जातं. त्यामुळे अर्थात रावण या गावचा नातू ठरतो. त्यामुळे इथेही त्याचं एक मंदिर आहे आणि दसऱ्याला त्याची पूजा केली जाते.

मंदसौर, मध्यप्रदेश :- असं म्हणतात की मंदसौर या जागेचं मूळ नाव दशपूर होतं. हे गाव म्हणजे रावणाची पत्नी मंदोदरी हिचं माहेर आणि अर्थात रावणाची सासुरवाडी. साहजिकच रावण इथला जावई आहे आणि जावयाच्या पुतळ्याचं दहन करणं शक्य नाही. म्हणून त्याला पूजलं जातं.

जोधपूर, राजस्थान :- राजस्थानातल्या जोधपूरमध्ये रावणाचं मंदिर आहे. इथे विशिष्ट समाजाचे लोक स्वतःला रावणाचे वंशज मानतात. त्यामुळे दसऱ्याला ते रावणाचं दहन न करता पूजा करतात.

काकिनाड, आंध्रप्रदेश:- आंध्रप्रदेशच्या काकिनाड मध्ये रावणाचं मंदिर आहे. इथे रावणाला सामर्थ्यशाली मानलं जातं. इथल्या शिवमंदिरात शंकरासोबत रावणाचंही पूजन होतं.

बैजनाथ, हिमाचल प्रदेश :- इथल्या कांगडा जिल्ह्यातही रावणाची पूजा होते. रावणाने इथेच शिवशंकरांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून वर मागितला.

तसंच इथल्या लोकांचा असा समज आहे की, जर त्यांनी रावण दहन केलं तर त्यांचा मृत्यू ओढवेल. त्यामुळे भीतीपोटीही त्याचं दहन केलं जात नाही.

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology