LPG Subsidy
LPG Subsidy

LPG Subsidy : केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या योजनांमुळे आजघडीला अनेकांच्या स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर पोहोचले आहे. पण अजूनही अशी अनेक स्वयंपाकघरे आहेत जिथे एलपीजी सिलिंडर पोहोचलेले नाहीत.

सिलिंडरच्या वाढत्या किमती अनेकांना तोट्याच्या ठरतं आहेत, यामुळे एलपीजी सिलिंडरचे अनेक ग्राहक सरकारी अनुदानावर अवलंबून आहेत.

अशा परिस्थितीत केंद्र सरकार गरीब लोकांसाठी अनुदान देते. सध्या सरकार गॅस सिलिंडरवर गॅस सबसिडी देत ​​आहे, मात्र या सबसिडीचा लाभ उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस मिळवणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे.

पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जून 2020 पासून एलपीजीवर कोणतेही अनुदान दिले जात नाही.

त्याचवेळी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलपीजीबाबत जाहीर केलेली सबसिडी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना लागू आहे.

विशेष म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेबरोबरच, अर्थमंत्र्यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडरवर 200 रुपये गॅस सबसिडी देण्याची घोषणा केली होती. सध्या 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे.

प्रत्येक सिलिंडर बुक केल्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर सरकारकडून दर महिन्याला 200 रुपये सबसिडी पाठवली जाईल. त्यानुसार एका गॅस सिलेंडरची किंमत 800 रुपये असेल. उज्ज्वला योजनेचा 9 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

उर्वरित 21 कोटींहून अधिक गॅस कनेक्शनधारकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत. त्याच वेळी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की सबसिडीची रचना अशी आहे की ती कालांतराने कमी होते.

“व्याख्या पातळीवर, सबसिडी कालांतराने कमी होत जाते. सरकारने हळूहळू पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनवरील सबसिडी रद्द केली आहे आणि जून 2020 पासून, एलपीजी सिलिंडरवरही सबसिडी नाही.

मात्र, एलपीजी सबसिडी संपवण्याची कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. तर गेल्या वर्षभरात एलपीजी सिलिंडर 103.50 रुपयांनी महागला आहे.

तर जून 2020 मध्ये किंमत 809 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमतीत वाढ होऊनही त्याचा बोजा गॅस ग्राहकांवर टाकला जात नसल्याचेही पुरी म्हणाले.

याशिवाय, पहिला गॅस सिलिंडर संपल्यानंतर पुन्हा भरण्यासाठी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी कमी संख्येने येत असल्याचा अहवाल पुरी यांनी नाकारला.

अहवालानुसार, वर्षभरात फक्त एक गॅस सिलिंडर भरणाऱ्या ग्राहकांची संख्या 2019-20 मधील 1.81 कोटींवरून 2021-22 मध्ये 1.08 कोटींवर आली आहे. त्याच वेळी, वर्षभरात दरडोई सरासरी 3.68 सिलिंडरचा वापर झाला.