Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:–गेले अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर सर्वांसमोर आले आहेत.
संजय राठोड येणार असल्यानेच पोहरादेवीत सकाळपासूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. संजय राठोड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीसाठी रवाना झाले असून तिथे गेल्यानंतर ते बंजारा समाजाला उद्धेशून भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतके दिवस मौन बाळगणारे संजय राठोड आपली बाजू मांडताना नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे.
शासकीय वाहन देखील त्यांच्यासाठी पोहोचलं आहे. संजय राठोड यांचा हा शासकीय दौरा असला तरीही पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड मौन सोडणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.
संजय राठोडांवरील संकट दूर करण्यासाठी महंतांकडून पोहरादेवी मंदिरात होमहवन करण्यात येणार आहे. समर्थनार्थ होर्डिंग्ज तर सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राठोड यांनी चौकशीला सामोरं जावं अशी सूचना पोहरादेवी संस्थानने केली आहे.
पुजा चव्हाण या मुलीने पुण्यात ७ फेब्रुवारीला मध्यरात्री आत्महत्या केली. पूजा चव्हाण शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात राहत होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आसपास तिनं महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली.
हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं.
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात अनेक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यातून संजय राठोड यांच्याशी तिचा संबंध जोडला जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची दखल घेतली आहे.
पोहरादेवी हे बंजारा समाजाचे दैवत आहे. आज त्याठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत याग आयोजित करण्यात आला आहे. संजय राठोड हे आपल्या समर्थकांसह तेथे येणार आहेत. तेथे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मनोरा पोलिसांनी पोहरादेवी विश्वस्तांना नोटीस बजावली असून मंदिरात केवळ ५० जणांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संजय राठोड यांच्या ताफ्यात 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहनं, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे. संजय राठोड हे यवतमाळमधून आर्णीजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांची आणखी एक गाडी त्यांच्या ताफ्यात दाखल झाली.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर