बिग ब्रेकिंग : अखेर संजय राठोड यांचा राजीनामा !

Mhlive24 टीम, 28 फेब्रुवारी 2021:– पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुळच्या बीड जिल्ह्यातील पूजा या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरुन आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून दिले गेले होते.
राज्याचे वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड राजीनामा देणार का, याच्यावर जोरदार चर्चा सुरु होती. अधिवेशनापूर्वी राठोड राजीनामा देतील अशी शक्यता होती, ती खरी ठरली आहे. उद्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे आजच संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत हालचाली सुरु होत्या.
संजय राठोड वर्षा निवासस्थानी गेलेत. तसेच संजय राठोड आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राठोड आज राजीनामा देणार अशी चर्चा होती. दरम्यान, राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर प्रचंड दबाव आहे. त्याआधी संजय राठोड यांनी आजच राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर राजीनाम्याबाबत हालचाली सुरु झाल्या. अखेर संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. याप्रकरणात काही ऑडिओ क्लिप समोर आल्या असून त्यात राठोड यांचा आवाज असल्याने हे प्रकरण गंभीर बनले यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने सरकारवर हल्ले चढवण्यात आले होते.
राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला :- भाजपच्या महिला आघाडीने राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात तीव्र निदर्शने केली. त्याचवेळी सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता या सर्वामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता.
राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं :- राज्याच्या अर्थसंकप्लीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली.
समाज राठोड यांच्या पाठीशी आहे, असे भासवण्यात आले :- राजीनाम्यासाठी दबाव येत असल्यानेच संजय राठोड यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. समाज आपल्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण करून ‘मातोश्री’वर दबाव आणला. करोनाचे सारे नियम पायदळी तुडविले. समाज राठोड यांच्या पाठीशी आहे, असे भासवण्यात आले.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर