DA Hike : केंद्र सरकारव्यतिरिक्त ह्या राज्यांनी केली कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! आपल्या राज्यात काय परिस्थीती?

DA Hike : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 4 टक्के दराने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सुटका (DR) चा अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले की केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलै 2022 पासून वाढीव महागाई भत्ता आणि महागाई सवलतीसाठी पात्र असतील.

सरकारच्या या निर्णयामुळे ४१.८५ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९.७६ लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. अनुरथ ठाकूर म्हणाले की, या अंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 4 टक्के दराने महागाई भत्ता आणि मदतीचा हप्ता जारी केला जाईल.

या राज्यांनी महागाई भत्ता वाढवला

झारखंड

झारखंड सरकारच्या मंत्रिमंडळाने १० ऑक्टोबर रोजी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ही वाढ १ जुलै २०२२ पासून लागू होणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या निर्णयाचा फायदा १.३५ लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कॅबिनेट सचिव वंदना डडेल यांनी सांगितले की, या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के झाला आहे.

छत्तीसगड

छत्तीसगड सरकारने दिवाळीपूर्वी राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाच टक्के महागाई भत्त्यात वाढ दिली आहे. 14 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी डीए 5 टक्क्यांनी वाढवून 33 टक्के केला.

अधिकान्यांनी सांगितले की, राज्य सरकारने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (महागाई भत्ता) पाच टक्के वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री भूपेश बघेल यांच्या सूचनेवरून वित्त विभागाने डीएमध्ये वाढ करण्याचे आदेश जारी केले आहेत.

अधिका-यांनी सांगितले की डीएचा वाढलेला दर चालू ऑक्टोबर महिन्यापासून लागू होईल आणि त्याचे पेमेंट 1 ऑक्टोबर 2022 पासून केले जाईल, डीएमध्ये पाच टक्के वाढ केल्यानंतर राज्यातील सातव्या वेतनश्रेणीतील पगारदारांना ३३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

हरियाणा

हरियाणाच्या मनोहर लाल सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के केला आहे.

वाढीव भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू होईल. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांनी 18 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात लेखी आदेश जारी केले. राज्यातील सुमारे अडीच लाख कर्मचारी सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेत असून, त्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.

यूपी

उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीची भेट देत 1 जुलैपासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात चार टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 18 ऑक्टोबरला ट्विट करून ही माहिती दिली होती.

“उत्तर प्रदेश सरकारने 1 जुलै 2022 पासून राज्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक / कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर सध्याच्या 34% वरून 38% पर्यंत वाढवला आहे.” ते म्हणाले. याच ट्विटमध्ये आणखी एक महत्त्वाची घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला 6,908 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 7 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारी कर्मचान्यांच्या महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. सध्या कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २७.२५ टक्के महागाई भत्ता मिळतो, तो वाढून ३१ टक्के झाला आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर 1,282.72 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले की, ” मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 1 जुलै 2022 पासून सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3.75% वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर 1,282.72 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

पंजाब

पंजाब सरकारने 21 ऑक्टोबर रोजी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट असल्याचे म्हटले आहे. आणखी एका निर्णयात, राज्य मंत्रिमंडळाने यावर्षी १ ऑक्टोबरपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ६ टक्के महागाई भत्ता (डीए) देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.

आसाम

आसाममधील सरकारी कर्मचान्यांच्या पगारातही महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी आसाम सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा केली आहे. डीएमधील वाढीव दर यावर्षी १ जुलैपासून लागू होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही घोषणा केली आहे…

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मला हे करताना आनंद होत आहे. याआधीही राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांना ३६ हजार स्कूटरचे वाटप करण्याची घोषणा केली होती आणि राज्यातील होमगार्डच्या महागाई भत्त्यातही वाढ जाहीर केली होती.