Health insurance : आजघडीला आपण कोरोनाला सामोरे जाताना बऱ्याच गोष्टीचं समजून घेत आहोत. त्यातलीच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आरोग्य विमा असणे.

हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च लक्षात घेऊन लोकांनी आता हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात सध्या अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे लोकांनी कोणतीही योजना घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि स्वतःसाठी योग्य आरोग्य विमा कवच निवडला पाहिजे.

अशातच चालू आर्थिक वर्षात आरोग्य विमा महाग होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील महागाई आणि कोविडशी संबंधित क्लेमची वाढ यामुळे विमा कंपन्यांवर वाढता दबाव हे याचे कारण आहे.

अनेक विमा कंपन्यांनी किरकोळ आरोग्य विमा उत्पादने महाग केली आहेत. त्याच वेळी, अनेक कंपन्या येत्या काही महिन्यांत किंमत वाढवण्याच्या तयारीत आहेत.

एका इंडस्ट्री एक्झिक्युटिव्हचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी कोविडशी संबंधित उच्च क्लेममुळे विमा कंपन्यांवर परिणाम झाला आहे.

काही कंपन्या किरकोळ आरोग्य उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांनी तर काही 20 टक्क्यांनी वाढवण्याचा विचार करत आहेत. याशिवाय, कोविड-19 महामारीशी संबंधित प्रोटोकॉलसह वैद्यकीय क्षेत्रातील महागाई लक्षात घेऊन विमा कंपन्या आरोग्य विमा उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याच्या तयारीत आहेत.

या कंपन्यांनी किमतीत वाढ केली:- किमतीतील वाढ लक्षात घेता, मणिपाल सिग्ना प्रोहेल्थ आणि स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने किरकोळ उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. दोन्ही कंपन्यांनी आरोग्य विमा उत्पादनांच्या प्रीमियममध्ये अनुक्रमे 14 टक्के आणि 15 टक्के वाढ केली आहे.
मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसून सिकदार सांगतात की, कोरोना महामारीमुळे उपचार प्रोटोकॉलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
यामुळे दाव्यांचा खर्च वाढला आहे. हे लक्षात घेऊन आम्ही तीन वर्षांनंतर आरोग्य विमा उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. दुसरीकडे, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद रॉय म्हणतात की,
आम्ही आता आमच्या प्रमुख उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. इतर उत्पादनांचे मूल्यांकन केले जात आहे. गरज पडल्यास इतर उत्पादनांच्या किमतीही वाढवल्या जातील.
कोविडचे क्लेम वाढण्याची शक्यता आहे
अलीकडेच, मोतीलाल ओसवाल यांनी रेटिंग एजन्सी इक्राचा हवाला देत आपल्या अहवालात 2020-21 या आर्थिक वर्षातील एकूण आरोग्य दाव्यांमध्ये कोविडशी संबंधित दाव्यांचा वाटा सुमारे सहा टक्के असल्याचे सांगितले होते. 2021-22 या आर्थिक वर्षात त्यांचा हिस्सा 11 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
आशियाई देशांमधील वैद्यकीय महागाई  (% मध्ये)
भारत 14
चीन 12
इंडोनेशिया 10
व्हिएतनाम 10
फिलीपिन्स 09