7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. 22 सप्टेंबर रोजी राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) दोन महत्वाचे शासन निर्णय (GR) शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या (State Government) वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वाचे शासन निर्णय यावेळी जारी करण्यात आलेत.

वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या सदर शासन निर्णयात राज्य कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2022 संदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत तसेच सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर 2 मधील जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह राशी प्रदान करण्याबाबत कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत हे दोन्ही शासन निर्णय महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. आज आपण 22 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या दोन्ही शासन निर्णयाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम 2022 बाबत शासन निर्णय

मित्रांनो 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम 2022 बाबतच्या शासन निर्णयात सुधारित वेतन स्तरानुसार वेतननिश्चिती करताना पुर्वीच्या असुधारित वेतनस्तरातील वेतनापेक्षा कमी वेतन निश्चिती होत असल्यास अतिप्रदानाची वसुली क्षमापित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता या शासन निर्णयानुसार एस -27 रुपये 123100-215900/- या सुधारित वेतनस्तरानुसार वेतननिश्चिती करताना असुधारित वेतन स्तरातील वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित होत असल्यास  दि.01.01.2016 ते 28.04.2022 या कालावधीतील अतिप्रदानाची वसुली करण्यात येवू नये. असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

NPS कर्मचाऱ्यांच्या स्तर -2 मधील जमा रकमांचे व्याजासह प्रदान करणेबाबत 

तसेच NPS कर्मचाऱ्यांच्या स्तर -2 मधील जमा रकमांचे व्याजासह प्रदान करणेबाबत देखील 22 सप्टेंबर रोजी वित्त विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सदर शासन निर्णय जशास तसा खालील प्रमाणे :-

अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या दिनांक १ जानेवारी २००६ ते दिनांक ३१ मार्च २००९ या कालावधीतील थकबाकीची स्तर-२ मध्ये जमा असलेली रक्कम व त्यावरील देय व्याज प्रदान करण्यास वित्त विभागाच्या दिनांक ०८/१०/२०२१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. आता परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या दि. १ जानेवारी २००६ ते दिनांक ३१ मार्च २००९ या कालावधीतील थकबाकीची स्तर-२ मध्ये जमा असलेली रक्कम व त्यावरील देय व्याज प्रदान करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यवाही विहित करण्यात येत आहे:

१. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर २ (Tier-II) मध्ये जमा असलेली रक्कम व त्यावरील देय व्याज प्रदानाची कार्यवाही सोबत जोडण्यात आलेल्या जोडपत्र एक नुसार करण्यात यावी.

२. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची एक किंवा अनेक हप्त्यांची स्तर-२ मधील रक्कम चुकीच्या वर्गीकरणामुळे त्यांच्या PRAN खात्यावर स्तर-१ मध्ये जमा झाली असल्यास, अशा प्रकरणी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास सक्षम असलेला कार्यालय प्रमुख (संवर्ग नियंत्रक अधिकारी) यांनी कळविल्यानंतर, कोषागार अधिकारी, सदर स्तर-२ ची रक्कम अधिक शासन अंशदान व त्यावरील व्याजासह ईआरएमद्वारे परत मागविण्याची कार्यवाही शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक: अंनियो २०१७/प्र.क्र.२८/सेवा ४ दि.२८/०७/२०१७ मधील परिच्छेद ३ व ४ नुसार करतील.

३. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत स्तर-२ च्या रकमांवर दि. ३१/१२/२०२२ अथवा परताव्याचा दिनांक यापैकी जी अगोदर असेल त्या तारखेपर्यंत भविष्य निर्वाह निधीवर वेळोवेळी जाहीर केलेल्या व्याज दरानुसार व्याज देय राहिल. तरी, प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास सक्षम असलेला कार्यालय प्रमुख ( संवर्ग नियंत्रक अधिकारी) यांनी परताव्याबाबतची कार्यवाही माहे डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करावी.

४. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची स्तर-२ मध्ये जमा असलेली रक्कम व्याजासह प्रदान करण्यासाठी उपरोक्त संदर्भ क्र.८ येथील नमूद शासन निर्णयातील मुद्दा क्र. २ नुसार खालील नमूद लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावी.

“मागणी क्र. जी-९९ ८३४२ इतर ठेवी,

(००) (११७) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (००) (०१) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ८३४२००८८-५० इतर खर्च”

५. उपरोक्त लेखाशीर्षाखाली आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद राज्य अभिलेख देखभाल अभिकरण यांनी आवश्यकतेनुसार त्या-त्या आर्थिक वर्षात करावी.

वरील कार्यपध्दती जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे इत्यांदीमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफरांसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२२०९२२११५३११२१०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.