Success Story : चर्चा तर होणारच…! तुरुंगातील कैद्यांनी शेतीत केला चमत्कार…! मिळवलं 1 कोटींच उत्पन्न

Success Story : मित्रांनो भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील बहुतांशी जनसंख्या ही शेतीवर (Farming) आधारित आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Agriculture) चांगली कामगिरी देखील करत आहेत. मित्रांनो एवढेच नाही तर भारतातील कारागृहातील कैदी देखील शेतीमध्ये अभिनव उपक्रम राबवत आहेत. मित्रांनो पैठण खुल्या कारागृहामध्ये (Paithan Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कैदी (Prisoners) एखाद्या प्रयोगशील शेतकऱ्यांप्रमाणे कारागृहात शेती करत आहेत.

शेतीमधून हे कैदी करोडो रुपयांची कमाई करत आहेत. अशा परिस्थितीत या कारागृहाची आणि कैद्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मित्रांनो पैठण कारागृह स्वातंत्र्योत्तर काळात स्थापित करण्यात आले आहे. पैठण कारागृहातील कैद्यांचा 1967 मध्ये जायकवाडी धरणाच्या कामाला देखील हातभार लागलेला आहे. येथील कैद्यांनी जायकवाडी धरणाचे पूर्ण काम केले. यानंतर पैठण कारागृहाला जायकवाडी धरणा लगत असलेले तीनशे एकर जमीन देऊ करण्यात आली. यानंतर कारागृह प्रशासनाने 300 एकर शेत जमिनीवर शेती कसण्यास सुरुवात केली.

आता याच पैठण खुल्या कारागृहातून एक अतिशय कौतुकास्पद बाब समोर येत आहे. मित्रांनो पैठण कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी शेतीत चमत्कार करून दाखवला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पैठण खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 386 कैद्यांनी 2019-20 या काळात शेतीमध्ये चांगली मेहनत घेतली असून कारागृह प्रशासनाला तब्बल एक कोटी रुपयांचे उत्पन्न कमवून दिल आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पैठण खुल्या कारागृहात प्रशासनाच्या माध्यमातून 2019-20 यावर्षी कारागृहाच्या अधिनस्त असलेल्या तीनशे एकर शेतजमिनीत गहू, बाजरी, ऊस, अन्नधान्य, कडधान्य, सोयाबीन, आंबा, कोथिंबीर, कढीपत्ता, करडई, मेथी, शेपू, पत्ताकोबी, भोपळा, मुळा, भेंडी, कांदा, गाजर, गवार, डांगर, बटाटे, शेवगा, वांगे, मिरची, टमाटे, चवळी, आदी फळभाज्यांचे उत्पादन घेण्यात आले. एवढेच नाही तर ऊस, वैरण, शेणखत व दूध यातूनही कारागृह प्रशासनाला उत्पन्न मिळाले आहे.

तसेच पैठण खुल्या कारागृहात शेती उपयोगी पडणारी विविध औजारे बनविणे, विद्युत पंप, मोटार रिवायडिंग, लोहार, सुतार यांसारखी कामेही कुशल अर्ध कुशल कैद्यांकडून घेतली जातात. कैद्यांना याच्या मोबदल्यात ठराविक रक्कम देखील दिली जाते. 48 रुपये रोज ते 68 रुपये रोज पर्यंत कैद्यांना रोजंदारी दिली जाते. पैठण खुल्या कारागृहात गूळ तयार करण्यासाठी गुऱ्हाळ देखील आहे. मात्र कोरोना मुळे हे गुऱ्हाळ बंद होतं मात्र आता पाच लाख रुपये प्रशासनाने खर्चून हे गुराळ पुन्हा सुरू केल आहे.

या गुऱ्हाळात उत्पादित होणारा गुळ औरंगाबाद, जालना, नाशिक, पुणे, मुंबई, ऑर्थर रोड, कल्याण, भायखळा इत्यादी कारागृहाने पाठवला जातो तदनंतर हा गुळ विक्रीसाठी बाजारात दाखल होतो. निश्चितच गंभीर गुन्हे करून आलेले हे कैदी आता आपल्या चुकीची शिक्षा भोगत आयुष्याचे शिक्षण घेत आहेत. यामुळे कारागृहातून बाहेर पडणारा कैदी निश्चितच एक सुजाण नागरिक बनणार आहे.