Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) रोजाना वाढ पाहायला मिळत आहे. कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातही (Nashik News) उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) वाढ झाली आहे.
मात्र सदर दरवाढ ही फसवी असल्याचा शेतकऱ्यांचा (Farmer) आरोप आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) उन्हाळी कांद्याची (Summer Onion) आवक होत असून या कांद्याला 2200 रुपये प्रतिक्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद केला जात आहे.
कांद्याला चांगला विक्रमी बाजार भाव मिळत असल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र सदर दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे का? हा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. खरं पाहता चांगल्या दर्जाचा कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असला तरीदेखील सर्वसाधारण बाजार भाव अजूनही कमीच आहेत.
सध्या शेतकऱ्यांकडे असलेला कांदा चाळीत साठवलेला उन्हाळी कांद्याची प्रतवारी कमालीची ढासळली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा वजनाने हलका झाला असून त्याचा दर्जा देखील खालावला आहे. अशा परिस्थितीत साठवताना उच्च प्रतीचा असलेला कांदा आता कमी वजनाचा भरत असून याला बाजार भाव देखील कमी मिळत आहे. यामुळे सदर दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापार्यांना अधिक होताना पाहायला मिळत आहे.
व्यापारी वर्गाने स्वस्तात भरून ठेवलेला कांदा आता चढ्या दरात बाजारात विक्री होत आहे. तर दुसरीकडे शेतकरी बांधवांनी कांदा चाळीत साठवलेला कांदा आता मोठ्या प्रमाणात सडला असून त्याचे वजनही कमी झाले आहे. कांदाचाळी शेतकरी बांधवांनी जर तीन ट्रॅक्टर कांदा जर बराकीत किंवा कांदाचाळीत साठविला असेल तर आता फक्त एक ते दीड ट्रॅक्टर कांदा त्यांना मिळत आहे.
अशा परिस्थितीत बाजार भाव जरी उच्चांकी मिळत असला तरी देखील वजनात झालेली घट आणि खालवलेला दर्जा यामुळे शेतकर्यांचे नुकसान हे अटळ आहे. दरम्यान, यावर्षी सततच्या पावसामुळे आणि आता परतीच्या पावसामुळे लाल कांदा रोपवाटिका उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे लाल कांदा लागवड लांबणीवर पडली असून ज्या शेतकरी बांधवांनी लाल कांदा लागवड आता केले आहे त्यांनादेखील हवामान बदलाचा फटका बसत आहे.
यामुळे लाल कांदा उत्पादनात देखील घट होणार आहे. शिवाय आता उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असला तरी देखील सर्वसाधारण बाजार भाव कमीच असून यामुळे शेतकऱ्यांची सर्रास लूट माजवली जात आहे. एकंदरीत कांदा दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नसून व्यापाऱ्यांना होतांना दिसत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.