Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टी आणि गोगलगाय कीटकाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधवांचे खरीप हंगामात (Kharif Season) कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत मायबाप शासनाने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 3501 कोटी रुपयांची मदत (Compensation) जाहीर केली आहे.
मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता अतिवृष्टीची नुकसानभरपाई अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना देण्यासाठी प्रशासनस्तरावर काम जोमात सुरू आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला देखील मोठा फटका बसला आहे. जुलै ते ऑगस्ट या महिन्यात नांदेड जिल्ह्यात (Nanded) मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला.
अतिवृष्टीमुळे 7 लाख 41 हजार 946 शेतकऱ्याचे 5 लाख 27 हजार 491 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून संबंधित शेतकरी बांधवांच्या (Nanded Farmer) शेती पिकांचे पंचनामे करून सदर अहवाल शासनाकडे (Government) पाठवण्यात आला होता.
आता शासनाने देखील नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 717 कोटी 88 लाख रुपये पाठवले आहेत. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम वेगात सुरू असल्याचे सांगितले आहे.
ज्या शेतकरी बांधवांचे ते 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे त्या शेतकरी बांधवांना या निधीचा फायदा होणार आहे. तालुकास्तरावर निधी प्राप्त झाला असून आता लवकरच अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सदर निधी वर्ग केला जाणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांना निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये नांदेड- 25 कोटी 89 लक्ष, अर्धापूर -29 कोटी 16 लक्ष, कंधार -55 कोटी 12 लक्ष, लोहा 61 कोटी 5 लक्ष, देगलूर 42 कोटी 95 लक्ष, मुखेड 54 कोटी 70 लक्ष, बिलोली- 40 कोटी 35 लक्ष, नायगाव- 45 कोटी 5 लक्ष, धर्माबाद- 29 कोटी 53 लक्ष, उमरी- 40 कोटी 11 लक्ष, भोकर- 52 कोटी 43 लक्ष, मुदखेड- 24 कोटी 27 लक्ष, हदगाव-85 कोटी 20 लक्ष, हिमायतनगर- 42 कोटी 74 लक्ष, किनवट-67 कोटी 9 लक्ष, माहूर- 22 कोटी 20 लक्ष एवढा निधी वर नमूद तालुक्यांना मिळाला आहे. निश्चितच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली ही मदत त्यांच्यासाठी दिलासा देणारी ठरणार आहे.