रश्मी शुक्ला म्हणतात, ‘सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग, आता बळीचा बकरा!’

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :-  पोलिस दलातील बदली आणि बढतीमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. त्यांच्या पडताळणीसाठी सरकारच्या परवानगीने फोन टॅपिंग झाल्याचा दावा गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात केला. इतकंच नाही तर आपल्याला बळीचा बकरा केलं जात आहे, असं त्या म्हणाल्या.

पोस्टिंग आणि ट्रान्सफरसाठी लाच :- शुक्ला यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. पोलिस महासंचलाकांनी काही फोन नंबर देखरेखीखाली ठेवण्याचे निर्देश दिले होते. हे नंबर काही राजकारण्यांच्या संपर्कातील होते, जे भ्रष्टाचार करत होते.

आवडतं पोस्टिंग आणि ट्रान्सफरसाठी ते लाच मागत होते. त्यामुळेच काही फोन नंबर निगराणीखाली ठेवले होते”, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.

Advertisement

गुन्ह्याविरोधात उच्च न्यायालयात धाव :- न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. अवैध फोन टॅपिंगप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

वरिष्ठांच्या आदेशाचे पालन :- शुक्ला या पोलिस प्रमुखांच्या आदेशांचं पालन करत होत्या. त्यांनी टेलिग्राफ अधिनियमांनुसार राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही परवानगी घेतली होती; मात्र आता शुक्ला यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे, असा दावा जेठमलानी यांनी केला.

कुंटे यांनी शुक्ला यांना 17 जुलै 2020 पासून 29 जुलै 2020 पर्यंत फोन टॅपिंगची परवानगी दिली होती. कुंटे यांनी 25 मार्च 2021 रोजी सरकारला जो रिपोर्ट सादर केला, त्यामध्येही ही बाब नमूद आहे; मात्र ही परवानगी घेताना आपल्याला भ्रमित केलं होतं असं नंतर कुंटे यांनी सांगितलं.

Advertisement

फोन टॅपिंग नियमानुसारच :- गुन्हे रोखण्यासाठी कायद्याच्या बंधनात राहून वायरलेस संदेशांवर देखरेख ठेवणे, टॅप करणे हे नियमांना धरून आहे, असा दावा रश्मी शुक्लांच्या वकिलांनी केला. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होईल. तोपर्यंत पोलिसांनी शुक्ला यांच्यावर कोणतीही दंडात्मक किंवा अटकेची कारवाई करू नये, असं निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय ? :- एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे.

यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती.

Advertisement

त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”

सीबीआय शुक्लांना साक्षीदार करणार ? :- दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबादमध्ये या प्रकरणात शुक्ला यांचा जबाब आधीच नोंदवण्यात आला होता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker