Weather Update : मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या फेरीतील किंवा चरणातील पाऊस (Rain) आता लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात तसेच आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra Rain Update) देखील अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

मध्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) आजही अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आपल्या राज्यात देखील भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आयएमडीनुसार, बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम मध्य आणि पूर्व भारतात दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला असून गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आयएमडीनुसार, हे दाब क्षेत्र येत्या 24 तासांत ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व राजस्थानच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो.

स्कायमेट वेदर या खाजगी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीनुसार, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार बेट, केरळ, कोस्टल कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि बिहारच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ईशान्य भारतातील काही भाग, सिक्कीम, गुजरात, तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेशमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.  दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्येही पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात या भागात कोसळणार पाऊस 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता मात्र आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात कोकणसह, पूर्व विदर्भ, उत्तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.