Kanda Bajarbhav : कांदा (Onion Crop) हे महाराष्ट्रमध्ये उत्पादित केलं जाणारं एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. कांद्याची शेती (Onion Farming) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते.

महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) कांदा पिकावर अवलंबून असतात. मात्र यावर्षी कांदा शेतकरी बांधवांचा वांदा करत आहे. कांद्याला गेल्या काही दिवसांपूर्वी अतिशय कवडीमोल दर मिळत होता.

मात्र आता कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा 40 रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होत असून घाऊक बाजारात कांद्याला 25 रुपये प्रति किलोपर्यंतचा बाजार भाव (Onion Rate) मिळत आहे. मात्र येत्या काही दिवसात किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता होती.

मात्र आता यावर केंद्र शासनाने अंकुश घालण्यासाठी म्हणजेच कांदा दर नियंत्रित ठेवण्यासाठी बफर स्टॉक मधून कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी काढला आहे. यामुळे सर्वसामान्यांना कमी किमतीत कांदा उपलब्ध होईल मात्र शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा मावळणार आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, शासनाकडे कांदा आणि डाळीचा पुरेसा साठा शिल्लक असल्याने डिसेंबरपर्यंत कांदा आणि डाळींच्या किमती नियंत्रित राहणार आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहितकुमार सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती नुसार, सरकारकडे अडीच लाख टनापेक्षा अधिक कांदा साठा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त सरकारने आता 54 लाख टन कांदा राज्यांना पाठवला आहे. खरं पाहता खरीप हंगामात उत्पादित केल्या जाणाऱ्या कांद्याला अवकाळी तसेच परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे.

मात्र शासनाकडे कांदा बफर स्टॉक मध्ये मुबलक प्रमाणात शिल्लक असल्याने कांदा बाजारपेठेत आवक कमी होणार नाही परिणामी कांद्याचे दर नियंत्रित राहणार आहेत. यामुळे निश्चितच सर्वसामान्यांना कांदासाठी अधिकचा पैसा मोजावा लागणार नाही मात्र यामुळे शेतकरी बांधवांना देखील मोठा फटका बसणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मदर डेयरी, सफल, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार यांना केंद्रीय साठ्यामधून 800 रुपये क्विटल दराने कांदा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

यामुळे सहाजिकच कांद्याच्या किमती डिसेंबर पर्यंत नियंत्रित राहणार आहेत. असे असले तरी यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. आधीच शेतकऱ्यांनी बराकीत साठवलेला कांदा निम्म्यावर आला आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या दरात देखील घट झाल्यास शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार आहे.

कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते त्यांनी कांदाचाळीत जर तीन ट्रॅक्‍टर कांदा साठविला असेल तर आजच्या घडीला त्यांना मात्र दीड ट्रॅक्टर कांदा हाती पडत आहे. म्हणजेच कांदाचाळीत साठवलेला कांदा वजनाने कमी झाला असून मोठ्या प्रमाणात सडला देखील आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चिंतेत आता अजूनच भर पडत आहे.